Thursday, 26 December 2013

आता खरी सुरुवात..

मन म्हणाले, तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि जसा आहेस तसा सुंदर आहेस. समाजाच्या बळजबरीला बळी नको पडूस, स्वत:च्या अस्तित्वाला स्वीकार आणि तुझ्या अधिकारांसाठी लढा दे. मन म्हणाले खरे, पण हृदय जोरजोरात धडधडत होतं. मन बजावत होतं की बघ एकदा या लढय़ात उडी घेतलीस की परतीचा रस्ता बंद. मग जे काय होईल ते तुला स्वीकारावं लागेल आणि या वेळी दोष देण्यासाठी कोणीच नाही, कोणी असलं तर तो तू एकटाच! वाट खडतर आहे पण अशक्य नाही.. गे अ‍ॅक्टिव्हिस्ट नक्षत्र बागवे याने ‘युवा’च्या वाचकांसाठी मांडलेले स्वगत..rainbow-flagआणि बऱ्याच जणांच्या आयुष्यात मग तो एक असा क्षण येतो की जेव्हा त्यांच्या ग्रुपमधील इतर मुले मुलींबद्दल चर्चा करतात आणि ते अनकम्फर्टेबल होत जातात. इतरांना त्यांच्याबद्दल शंका येऊ नये म्हणून  ते सतत एक मुखवटा लावून फिरतात पण मन मात्र आतल्या आत झुरत असतं. कळायला काहीच मार्ग नसतो, सत्य समोर असतं पण ते मान्य करण्याची हिम्मत नसते. असं उगीचच वाटत राहतं की मी नॉर्मल होईन. पण कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य बदलत नाही आणि मग हे थकलेलं मन सत्य स्वीकारतं. हो आहे मी समलैंगिक आणि मला मुली नाही तर मुलगे आवडतात!
स्वत:च्या खऱ्या अस्तित्वाबाबतचा जरी पहिला मानसिक पेच सुटला असला तरी हे एक मोठं वादळ मनात फेर धरत असते. आई-वडिलांना कसे सांगू? ते मला स्वीकारतील का? आणि मित्र, हा समाज जो माझ्या अस्तित्वाला नाकारतो. मी असा एकटाच आहे, की माझ्यासारखे अजून बरेच लोक आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि माझी अवस्था कुणालाच समजत नाही. माझे मानवी अधिकार इतरांच्या भावना कशा काय दुखावतात? माझा माझ्या शरीरावर, माझ्या अवयवांवर, माझ्या मनावर आणि माझ्या अस्तित्वावर अधिकार नाही? कायदा हा मला गुन्हेगार ठरवितो? खूप भयंकर आहे हे सगळं, हीच ती वेळ असते जेव्हा सारखं वाटत राहते, कोणी तरी खास असावे आपल्यासारखे; ज्याच्याबरोबर आपण आपलं दु:ख शेअर करू शकू किंवा दोन सुखाचे क्षण जगून आपलं दु:ख विसरून जाऊ, पण मला असा कोणी तरी मिळेल का?..
हे सारे प्रश्न मलाही पडले पण मी एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन रडत बसण्याऐवजी मी त्याची उत्तरं शोधायला सुरूवात केली आणि जाणीव होत गेली की जगणे खूप कठीण केलंय या समाजाने.. त्यांच्या रूढी, परंपरा, त्यांचे ग्रंथ आणि त्यात भर म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पडद्यावर रेखाटलेली समलैंगिकांची पात्रे. सहन होत नाही जेव्हा ते आम्हाला अनैसर्गिक आणि विकृत मानतात. मी हजार वेळा अगदी प्रामाणिकपणे माझ्या मनाला विचारलं की मी विकृत आहे का? मनाने नाही असे उत्तर दिले. मन म्हणाले, तू निसर्गाचा एक भाग आहेस आणि जसा आहेस तसा सुंदर आहेस. समाजाच्या बळजबरीला बळी नको पडूस, स्वत:च्या अस्तित्वाला स्वीकार आणि तुझ्या अधिकारांसाठी लढा दे. मन म्हणाले खरे, पण हृदय जोरजोरात धडधडत होतं. अंग थंड पडलं पण मनात आशा निर्माण झाली होती मी बनण्याची. मन बजावत होतं की बघ एकदा या लढय़ात उडी घेतलीस की परतीचा रस्ता बंद. मग जे काय होईल ते तुला स्वीकारावं लागेल आणि या वेळी दोष देण्यासाठी कोणीच नाही, कोणी असलं तर तो तू एकटाच! वाट खडतर आहे पण अशक्य नाही.
मी सांगितलेच माझ्या आई-बाबांना, १७ वर्षाचा होतो मी. अपेक्षेप्रमाणे त्यांचा विश्वास बसला नाही. मुळातच मला अशी अपेक्षा नव्हती की मी जेव्हा त्यांना सांगेन की मी ‘गे’ आहे. त्यांनी मला मिठीत घेऊन सांगावे की ‘इटस ओके!’ माझी अगदी घर सोडण्याचीही तयारी झाली होती पण सुदैवाने तशी वेळ आली नाही. त्यांना हे नक्कीच मान्य नव्हतं पण मी स्वत:ला सांगितलं, ‘की जसा तू स्वत:ला स्वीकारायला वेळ घेतलास, तसा त्यांनाही वेळ दिला पाहिजे, किंबहुना जास्त वेळ द्यायला पाहिजे. कारण त्यांची पिढी या विषयाबद्दल कधीच बोलली नव्हती’. जसजसे दिवस गेले तसे घरातले वातावरण शांत होत गेले. मी माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ  दिला नाही आणि सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करीत होतो. आई-बाबा खूश होते आणि त्यांच्या मनामध्ये एक वेडी आशा होती की हा बदलेल. आणि आता पाच वर्षानंतर त्यांनी हे सत्य स्वीकारलं आहे की त्यांचा मुलगा हा समलैंगिक होता, आहे आणि राहील. पण मला खात्री आहे त्यांचा भर हा ‘मुलगा’ या शब्दावर असेल.!
सगळं कसं शांत वाटतंय, त्यांना सांगितल्यावर मला माझ्या डोक्यावरचे मोठे ओझे टाकून दिल्यासारखं वाटतंय. आता घुसमट होत नाहीये, जीव गुदमरत नाहीये माझा. मला माहीत आहे की त्यांना त्रास झाला पण मलाही आनंद नाही झाला. समाजासाठी भलेही मी एक स्वार्थी मुलगा असेन जो स्वत:च्या खुशीसाठी आई-वडिलांना दुखावतोय पण मला वाटतं खोटय़ा भ्रमात जगणे चांगले नव्हे. सत्य कोणीही पुसून टाकू शकत नाही किंवा मी कोणी एकता कपूरच्या सीरियलमधले पात्र नाही जे त्याग या नावाने बोंबा मारत बसेल.
समाजाला माझ्या लैंगिकतेबद्दल माध्यमांसमोर येऊन ओरडून सांगताना मला भीती नाही वाटली, किंबहुना मला ती गरज वाटली. कळू दे या समाजाला आम्हीही इथे जगतोय आणि स्वत:चे DSC_0943अधिकार मागायला घाबरत नाही. भलेही माझ्यासारखे खुल्या रूपाने पुढे येणारे लोक कमी आहेत पण मी त्यांच्या अश्रूंचा, त्यांच्या दु:खाचा, त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या घुसमटलेल्या आवाजाचा एक प्रतिनिधी आहे. मी बोलणार आणि बोलतच राहणार. खूप झाली दडपशाही, आता मागे हटणे नाही.
मी आता वयाच्या २३व्या वर्षी एक आंतरराष्ट्रीय अ‍ॅॅवॉर्ड विजेता फिल्ममेकर, एक अभिनेता, आणि एक गे राईट्स ऑॅक्टिव्हिस्ट आहे आणि या सर्व भूमिका पार पाडताना मला जाणवले की तुम्ही स्वत:बद्दल आणि स्वत:च्या मतांवर अगदी ठाम असता तेव्हा इतरांना ते सांगताना किंवा त्यांना ते स्वीकारायला खूप सोपे जाते.
काळ बदलतोय आणि लोक या विषयावर बोलू लागले आहेत. माझ्यासारखे बरेच तरूण-तरूणी मोकळेपणाने पुढे येऊन कबूल करतात की ते समलैंगिक आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लोकांना असे वाटले की हे लोक आता लपून बसतील पण उलटेच झाले! अनेक वर्षाचा संघर्ष, मनातला राग आता बाहेर येत आहे, लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे भिन्नलिंगी (हिटिरोसेक्शुअल्स) आणि राजकीय पक्षसुद्धा पुढे येऊन त्यांना सपोर्ट दाखवत आहेत.
हा प्रश्न समलैंगिकांच्या हक्काचा नाही तर भारतीय संविधानानुसार समान मानवी अधिकारांचा आहे. २१ व्या शतकात समाजाने विज्ञानाची कास धरावी. भारत हा सांस्कृतिक देश आहे पण संस्कृती आणि रूढीवादी असण्यामध्ये फरक आहे. आपली संस्कृती ही स्वीकारावर आधारित आहे, दुस-यांना दडपण्याची नाही.
११ डिसेंबर २०१३ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ज्या पद्धतीने हा सगळा विषय प्रकाशझोतात आला आणि त्यावर ज्या प्रकारची चर्चा झाली ती याआधी कधी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाली नव्हती. देशविदेशांतून निषेध झाला. आता हा विषय देशाच्या काही प्रमुख विषयांपैकी एक आहे आणि भलेही सुप्रीम कोर्टाने आम्हाला गुन्हेगार ठरविले असले तरीही आम्ही आमच्या हक्कांचा लढा चालूच ठेवणार आहोत. मी कोणाबरोबर माझा बेड शेअर करावा किंवा कोणाचा हात धरून रस्त्यावरून चालावे हा सर्वस्वी माझा निर्णय असेल. कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही. जोपर्यंत समान अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत लढतच राहू. ज्याचा आम्ही एक भाग आहोत त्या या समाजाला माझी एवढीच विनंती आहे की ‘जगा आणि जगू द्या!’ आणि ज्यांना असे वाटत असेल की आता समलिंगी चळवळ संपत आली आहे. त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की, खरी सुरुवात आता झाली आहे.
-नक्षत्र बागवे 

1 comment: